सांगली जिल्ह्याने राज्याच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण दिशा देणारे अनेक कर्तृत्ववान नेते दिले आहेत. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाचा दाखला देत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या समृद्ध राजकीय परंपरेचे कौतुक केले. विधानसभेत प्रभावीपणे विचार मांडून जनतेसाठी काम करणाऱ्या या नेत्यांचा वारसा पुढे नेत लोकप्रतिनिधींनी समाजासाठी सातत्याने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी मिरज येथे केले.
जिल्हा समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सत्कार विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मिरज येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला मिरज संस्थानचे गंगाधरराव (बाळासाहेब) पटवर्धन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सत्यजीत देशमुख यांचा गौरव करण्यात आला.
विशाल पाटील यांसारखे तरुण खासदार जिल्ह्याला लाभले असून सांगली जिल्ह्याचा समृद्ध राजकीय वारसा पाहता भवितव्य उज्ज्वल आहे, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळाची ओळख ही प्रगल्भ लोकप्रतिनिधींमुळे होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाने समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण केला असून त्यांच्या समस्या सोडवून न्याय देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पटवर्धन यांनी केले.
सध्या इतरांना शिव्या देऊन समाजात मोठे होण्याची फॅशन सुरू झाली आहे, मात्र एखाद्या समाजाबद्दल द्वेष व्यक्त करणे चुकीचे आहे, असे मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आपण सर्वप्रथम मराठी आहोत आणि पाचशे किंवा हजार वर्षांपूर्वीचे दावे काढून एखाद्याला जोडत बसणे अयोग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समाजात सौहार्द कायम राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.