शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “ही तुमची सत्तेमुळे फडफड सुरू आहे. पण जेव्हा सत्ता जाईल, तेव्हा तुम्हाला मातोश्री आणि शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल,” असा घणाघाती इशारा संजय राऊतांनी दिला. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत आरोप केले होते, संजय राऊतांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे.
“आम्ही पक्षाशी इमान राखलं, त्यामुळे आमच्याकडे बळ आहे. दिल्लीच्या मोगलांशी हातमिळवणी करून महाराष्ट्राचा विध्वंस करणाऱ्या शक्तींना रोखण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला परमेश्वराने दिली आहे,” असा हल्लाबोल राऊतांनी केला. “हे तुमचं फडफडणं तात्पुरतं आहे, सत्ता आहे म्हणून फडफडता आहात. पण एक दिवस तुम्हालाच मातोश्रीच्या दारात आणि शिवसेना भवनाच्या उंबरठ्यावर यावं लागेल. हा माझा अंदाज नाही, हा माझा ठाम दावा आहे,” असा घणाघाती इशारा त्यांनी रामदास कदम यांना दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतील वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“राजकारणात पैशाचा जोर वाढलेला आहे आणि आमदार, नगरसेवकांच्या खरेदी-विक्रीसाठी भ्रष्टाचाराचा पैसा वापरला जात आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे याला आळा घालण्याचे काम करत आहेत,” असे राऊत म्हणाले. “फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते काही उत्तम निर्णय घेत असतील तर त्याचे समर्थन करायला काही हरकत नाही. हेच लोकशाहीचे खरे स्वरूप आहे. तसेच, “जे फक्त पैशाच्या अपेक्षेने पक्ष सोडून गेले, त्यांना आता मधल्यामध्ये लटकत राहावे लागणार आहे,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “फक्त कोकणातूनच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातून अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कोकणात उद्धव ठाकरेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. तिथे केवळ एक आमदार निवडून आला, तर उर्वरित सर्व जागा गमवाव्या लागल्या. भविष्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्रातूनही हद्दपार होतील,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “गंगेत अनेकांनी डुबक्या मारल्या, पण त्यामुळे सगळेच पापी ठरत नाहीत. जसे कावीळ असलेल्या व्यक्तीला संपूर्ण जग पिवळे दिसते, तसेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सकाळी उठल्यापासून फक्त एकनाथ शिंदेंच दिसतात,” असा टोला त्यांनी लगावला. “शेवटी ठाकरेंकडे ‘हम दो, हमारे तीन’ इतकेच शिल्लक राहतील,” अशी जोरदार टीका करत त्यांनी शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.