स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारप्रकरणातील फरार आरोपी, सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला अखेर तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, आरोपी लपून बसला होता, मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याला शोधून काढले. संपूर्ण घटनेचा लवकरच पर्दाफाश केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तपास योग्य स्तरावर पोहोचल्यावर संपूर्ण माहिती उघड केली जाईल, असे सांगत पोलीस आयुक्तांकडून तपासाबाबत काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वारगेट बसस्थानकातील बलात्कारप्रकरणातील आरोपीने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर प्रतिक्रिया देणे सध्या घाईचे होईल, असे सांगत त्यांनी पुढील तपासानंतरच या संदर्भात बोलणे योग्य ठरेल, असे स्पष्ट केले. पुणे पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू केली असून, काही तांत्रिक आणि फॉरेन्सिक माहिती मिळालेली आहे. संपूर्ण माहिती एकत्र आल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, स्वारगेट बलात्कारप्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला हवे. हा परिसर गजबजलेला असून, बस बाहेर उभी असतानाही लोकांच्या लक्षात घटना आली नाही, हेच ते सांगू इच्छित होते, असा माझा समज आहे, असे फडणवीस म्हणाले. मात्र, योगेश कदम नवीन व तरुण मंत्री आहेत आणि काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणांवर बोलताना अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशा घटनांवर बोलताना जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने प्रतिक्रिया द्यायला हवी, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.