जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शिवसेना मेळाव्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा राजकीय प्रवेश होणार आहे. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ते स्वतः शिवसेनेत प्रवेश करत असून, त्यांच्यासोबत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मधून हकालपट्टी झालेले माजी आमदार बाळासाहेब दांगट, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके यांच्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश मेळावा सायंकाळी ४:३० वाजता होणार असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी पुणे जिल्ह्यात मात्र आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध थेट लढत देऊ, अशी ठाम भूमिका आमदार शरद सोनवणे यांनी मांडली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवजन्मभूमी असलेल्या शिवनेरीला मंत्रिपद देण्याचे सूचक वक्तव्य केले असून, याच्या दुसऱ्या टप्प्यात निश्चितच पद मिळेल अशी अपेक्षा आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केली. नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपण जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो असलो तरी आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माघारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सत्यशील शेरकर यांनी पॅनल जाहीर केले असले तरी शेतकरी संघटनेशी चर्चा करून काही जागा समायोजित करण्याचा आणि निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले. तसेच, संचालक पदांसाठी काही आवश्यक बदल करण्याची गरज असल्यास आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या निवडणुकीत अंतिम टप्प्यात राजकीय समीकरणे कशी आकार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.