Posted in

“विरोधकांनी उगाच वाद निर्माण करू नये”; हर्षवर्धन सपकाळांचा राहुल गांधींच्या समर्थनार्थ पलटवार!

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी केली जात असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यांच्या शुभेच्छांमध्ये मोठी चूक आढळल्याने विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींचा बचाव केला आहे.

शिवजयंतीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पोस्टमध्ये ‘श्रद्धांजली’ या शब्दाचा उल्लेख झाल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका करत, शिवरायांना श्रद्धांजली नव्हे तर आदरांजली द्यायला हवी होती, असे म्हटले. या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांचा बचाव केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्याऐवजी विरोधकांनी राहुल गांधींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या एक्सवरील पोस्टमध्ये “श्रद्धांजली” हा शब्द वापरण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला असला, तरी ही एक तांत्रिक चूक असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. “गुगल ट्रान्सलेटमुळे हा शब्द आला असण्याची शक्यता आहे, पण राहुल गांधींच्या भावना स्पष्ट आहेत. त्यांनी शिवरायांना आदरपूर्वक अभिवादन केले आहे. विरोधक मुद्दाम राजकारण करत आहेत, हे काही नवीन नाही. यापूर्वीही पंडित नेहरूंबाबत असेच करण्यात आले होते,” असा जोरदार पलटवार करत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवरून वाद वाढत असून, भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, मात्र राहुल गांधी हे वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी अनादर व्यक्त करत आहेत. हा प्रकार गंभीर असून, त्यांनी ही पोस्ट तात्काळ मागे घ्यावी आणि योग्य शब्दांचा वापर करावा. अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते,” असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत, “शिवाजी महाराजांनी केवळ बलाढ्य शत्रूंशीच लढाई केली नाही, तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशीही संघर्ष केला. त्यांनी वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी आणि महात्मा बसवेश्वर यांच्या विचारसरणीचा आधार घेत बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही शिकवण दिली. आजही त्यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत, आणि त्यांच्याच मार्गावर आम्ही वाटचाल करत राहू,” असे स्पष्ट केले. तसेच, शिवरायांच्या नेतृत्वाखाली आठरापगड जातीच्या मावळ्यांनी स्वराज्य उभे केले, हीच महाराष्ट्राची खरी ओळख असल्याचेही त्यांनी नमूद केले.