दिल्लीमध्ये झालेल्या एका विशेष सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते “महादजी शिंदे” पुरस्काराने गौरव करण्यात आला. मात्र, या सन्मान सोहळ्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाने या पुरस्कारावर आक्षेप घेत संजय राऊत यांनी शरद पवारांना थेट लक्ष्य केले. सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी, “महाराष्ट्राच्या शत्रूंना असे पुरस्कार देणे कुणालाही मान्य होणार नाही,” असे म्हणत पवारांवर टीका केली. यावर शिंदे गटाच्या नेत्यांनीही संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, हा सन्मान ऐतिहासिक परंपरेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवारांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत स्वतःला विश्वज्ञानी प्रवक्ते समजतात. संपूर्ण विश्वातील ज्ञान त्यांच्याकडेच आहे, आणि त्यांच्याविरुद्ध कुणी भूमिका घेतली, तर ते सहन करत नाहीत,” अशी टीका करत त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. राऊतांच्या भूमिकेमुळेच ठाकरे गटाचं राजकीय स्थान दिवसेंदिवस ढासळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे हे ठरवण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी राऊतांच्या आरोपांवर पलटवार केला. तसेच, “२०१९ मध्ये ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसल्याचे उत्तर आधी द्या,” असा थेट सवालही राऊतांना केला.
“संजय राऊत स्वतःला एवढे मोठे समजतात की शरद पवारांनी काय करावे आणि काय नाही, हे देखील त्यांनाच ठरवायचे आहे. ज्यांना ते गद्दार म्हणतात, त्यांच्याच मतांवर निवडून आले आहेत, मग राजीनामा द्यायची हिंमत आहे का?” असा सवाल शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. त्यांनी ठाकरे गटावर हल्ला चढवत, “शिवसेना आणि भाजप म्हणून निवडणूक लढवली आणि सत्ता मिळवण्यासाठी कोणासोबत जाऊन बसलात? हेच लोकांशी गद्दारी नाही का?” “मशिदीत जाऊन पाया पडणारे, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे आता बाळासाहेबांचा वारसा सांगत आहेत,” असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली. “रणांगणात एकनाथ शिंदे लढले, त्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांशी खरी निष्ठा ठेवली, आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्याचीच पावती निवडणुकीच्या निकालातून दिली आहे,” असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंचा सन्मान करत त्यांचं नेतृत्व सर्वमान्य असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे,” असे सांगत मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. “५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिलेल्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला आहे.” “एकनाथ शिंदेंचं कौतुक करणारा माणूस त्यांच्यासाठी वाईट ठरतो, म्हणूनच आता शरद पवारांवरही टीका केली जात आहे.” “साहित्य संमेलनाला दलाली म्हणणं म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे,” असा आरोप करत त्यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले.