Posted in

“दिल्लीत ‘आप’चा धक्कादायक पराभव! पक्ष कार्यालयाच्या दरवाजांना कुलूप; कार्यकर्तेही बाहेर”

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा पराभव झाला आहे. केवळ काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या आतिशी मार्लेना यांनी मात्र आपला मतदारसंघ जिंकला आहे. या पराभवामुळे पक्ष मुख्यालयात निराशेचे वातावरण पसरले आहे. भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर ‘आप’ला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (आप) मोठा पराभव स्पष्ट होताच पक्ष मुख्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष मुख्यालयाचे मुख्य गेट आतून बंद करण्यात आले असून, कोणालाही प्रवेश दिला जात नाही. विशेष म्हणजे, कार्यालयात काम करणाऱ्या महिलेला देखील आत घेण्यात आलेले नाही, त्यामुळे कार्यकर्ते तिच्या प्रवेशासाठी फोनाफोनी करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्येच ‘आप’ मागे असल्याचे स्पष्ट झाले होते, तेव्हापासूनच कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव निश्चित झाल्यानंतर पक्षाने मुख्यालयाचे दरवाजे बंद करून घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा जवळपास पूर्ण पराभव झाला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी 3,186 मतांनी पराभूत केले आहे. तसेच, आपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून सुमारे 600 मतांनी पराभूत झाले आहेत. राजेंद्र नगर मतदारसंघातही पक्षाला धक्का बसला असून, येथे आपचे उमेदवार दुर्गेश पाठक पराभूत झाले आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात साधेपणा आणि प्रामाणिकतेचे प्रतिक म्हणून केली होती. मेट्रोने प्रवास करणे, स्वस्त गाडीचा वापर, आणि सुरक्षा नाकारणे या त्यांच्या कृतींनी त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे स्थान दिले होते. मात्र, ४० कोटी रुपयांच्या सरकारी बंगल्यावरील वादामुळे त्यांच्या साध्या प्रतिमेला तडा गेला. जनतेने ज्याला आपला नेता मानले, त्याच नेत्याच्या व्हीव्हीआयपी जीवनशैलीने लोकांच्या अपेक्षांना धक्का दिला. दारु घोटाळ्यात त्यांचे तुरुंगवास भोगणे आणि भाजपविरोधात सातत्याने लहानसहान गोष्टींवरून राजकारण करणे या गोष्टींनी जनतेचा विश्वास उडाला. या सर्वांचा परिपाक म्हणून दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा मोठा पराभव झाला, ज्यामध्ये केजरीवाल यांचाही समावेश आहे.