२०२४ विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत एकजूट नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत असताना, ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महायुतीमध्येही अंतर्गत मतभेद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाच्या एका मंत्र्यांनी दिलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिकेबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगामी स्थानिक निवडणुकीत महायुतीतील एकी टिकेल की तणाव वाढेल, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
मुंबईसह विविध महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने आधीच सुरू केली आहे, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनीही स्वतंत्र लढतीचा पर्याय खुला ठेवला आहे. अशातच महायुतीत मोठा भाऊ मानल्या जाणाऱ्या भाजपानेही स्वबळाची चाचपणी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. दुग्ध विकास व पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचक विधानामुळे महायुतीतील समसमान वाटपाबाबत तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असून, कोणतीही निवडणूक असो, तिच्यासाठी आधीपासूनच मोर्चेबांधणी आवश्यक असते. २५ फेब्रुवारीला न्यायालयाचा निकाल लागल्यास दोन महिन्यांत निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागणे महत्त्वाचे आहे, असे भाजपाचे मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपाने विधानसभेत आपली ताकद दाखवली असून, जर महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमत झाले नाही, तर भाजपाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास तयार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, याच पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकांबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून, काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी नोंदणी झाल्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. याबाबतचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर पुढील दहा दिवसांत ही नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडळ अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि प्रदेश स्तरावरील नियुक्त्या करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांनी यासाठी सक्रिय राहावे, असा आग्रहही त्यांनी व्यक्त केला.