उद्धवसेनेचा एक महत्त्वाचा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याला राष्ट्रवादीतूनच विरोध येऊ लागला आहे. पार्टीतील काही पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांच्या या निर्णयाविरोधातील भावना व्यक्त केल्या आहेत. या विरोधामुळे आता अजित पवार गटात या पदाधिकारीच्या प्रवेशावर अनिश्चितता निर्माण झाली आहे.
राज्यात महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि उद्धवसेनेतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये घालमेल सुरू झाली आहे. अनेकजण आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करून राजकीय पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातच कोल्हापूर शहरातील उद्धवसेनेचा एक पदाधिकारी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची विनंती करत आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
महापालिकेच्या राजकारणात हसन मुश्रीफ आणि उद्धवसेनेच्या या पदाधिकाऱ्याचे चांगले संबंध आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्षात प्रवेश करण्याची विनंती केली. मात्र, त्याला विरोध करणाऱ्या माजी नगरसेवकांनी पक्षात या पदाधिकाऱ्याचा प्रवेश न दिल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे
उद्धवसेनेच्या या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबरोबरच जिल्हाध्यक्ष पद देण्याची मागणी केली आहे. त्याने तालुक्यांच्या पातळीवर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्याचा आग्रह धरला आहे.