उद्धव सेनेचे माजी आमदार राजन साळवी यांना लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटात प्रवेशाची ऑफर मिळाली होती. त्यांनी त्यासाठी सकारात्मकता देखील दर्शवली होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल आणि मंत्रीपद मिळेल या आशेने त्यांनी पक्ष बदलला नसावा, असे राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये राजन साळवी यांचा प्रवेश अद्याप लांबला असून, याबाबत आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरी येथे मोठा गौप्यस्फोट केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीनंतर राजन साळवी शिंदे गटात जाणार होते, पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल आणि मंत्रीपद मिळण्याची संधी मिळेल या आशेने त्यांनी निर्णय बदलला. मात्र, अपेक्षेप्रमाणे परिस्थिती घडली नाही, असे आमदार सामंत यांनी सांगितले.
गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिल्यामुळे त्यांच्यासोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत, असा दावा आमदार किरण सामंत यांनी केला. त्यांच्यासोबत जाण्यास कोणीही इच्छुक नाही, उलट ते ज्या पक्षात जातील, तिथले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्याकडे येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.