Posted in

नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”

महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले असून, दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाने राज्याला कलंकीत करण्याचे काम केले असून, सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे कार्य थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. मुंबईतील सेलिब्रिटींची सुरक्षा धोक्यात आहे, तर गावात सरपंचही सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेची काय स्थिती असेल, असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.

नागपुरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, राज्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धोका उरलेला नाही. गुन्हेगारांची मानसिकता अशी झाली आहे की, त्यांना आता कोणताही धोका नाही, हे खेदजनक आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था फक्त गृहमंत्र्यांवर अवलंबून नाही, कारण मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री दागी असताना या परिस्थितीचे चित्र वेगळे कसे असू शकते. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला जाती आणि धर्माच्या दृष्टिकोनातून बघू नका, असंही त्यांनी स्पष्ट केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जाती-धर्माच्या भेदभावाला ठाव नाही, आणि या राज्यात प्रत्येक जाती आणि धर्मातील लोकांना सुरक्षा मिळायला हवी, असे पटोले यांनी सांगितले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू या घटनांना जाती आणि धर्माशी जोडून पाहणे योग्य नाही. भाजप-युती सरकारने मराठा-ओबीसी वाद उभा केला असून, त्यामुळे जनतेच्या मूळ समस्यांना मागे टाकले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत, युवक बेरोजगारीला तोंड देत आहेत, आणि महागाई आसमानी पातळीला पोहोचली आहे. हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरकारविरोधात आवाज उठवताना जाती आणि धर्माच्या वादात न अडकता सर्वांनी एकत्र येऊन हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.