Posted in

“जळगावातील पाळधीत गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरच्या हॉर्नवरून राडा; संचारबंदी लागू”

सरत्या वर्षाच्या निरोपाच्या रात्री जळगावात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यात त्यांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याच्या आणि कारला कट मारल्याच्या कारणावरून एका व्यक्तीशी वाद झाला. या वादातून जमावाने उच्छाद माजवला आणि वाहने तसेच दुकाने जाळण्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी प्रसंगावधान राखून ताबा घेतला आहे.

पाळधी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबासोबत त्यांचा ड्रायव्हर कार चालवत असताना हॉर्न वाजविल्याच्या आणि कारला कट मारल्याच्या कारणावरून वाद सुरु झाला. यामुळे गावातील काही तरुण एकत्र आले, आणि शिवसेनेचे कार्यकर्ते देखील तिथे पोहोचले त्यामुळे गोंधळ माजला. या वादातून दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या, ज्यात १२-१५ दुकाने जाळली गेली.

पाळधी गावात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून २०-२५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, अंतर्गत वादामुळे दोन गटांमध्ये वाद सुरू झाला, ज्यामुळे परिस्थिती अधिक ताणली गेली.