मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आता हिशोब चुकता करण्याची खरी वेळ आली आहे. होऊ द्या आता, आधी दुसऱ्यांवर जबाबदारी ढकलली जात होती, पण आता मी विरोध करत नाही. मी म्हणतो, द्या.” त्यांचे हे शब्द राज्य सरकारला दबावात आणणारे असून, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी परभणी दौऱ्यावर असताना, सूर्यवंशी कुटुंबीयांची तर मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “कोणाचाही दबाव येवो, मी त्या मॅटरला थांबवणार नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही.” तसेच, सरकारवर टीका करत ते म्हणाले, “मोबाइल फोन तपासायला सरकारला इतके दिवस का लागतात?”
मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारी २०२५ पासून अंतरवली येथे आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी तीव्र लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, सरकारला त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास भयंकर आंदोलनाची चेतावणी दिली आहे. या आंदोलनात राज्यभरातील मराठ्यांना अंतरवलीकडे येण्याचे आवाहन करत, “मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा,” असे सांगितले. त्यांनी हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे असल्याचे स्पष्ट केले आणि सर्वांना सोशल मीडियावर या संदेशाचे प्रसारण करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची सूचना दिली आहे. त्यांनी सर्व गावकऱ्यांना “माझे गाव माझी जबाबदारी” म्हणून आपल्या गावात बैठका घेण्याची आणि प्रत्येक घरात जाऊन मराठा आरक्षणासाठी आमंत्रण देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, २५ जानेवारीला कोणीही लग्नाची तारीख ठरवू नये, अशी सूचना त्यांनी दिली. याशिवाय, जर मराठा आरक्षणाचा विषय मिटला तर हे शेतमालाला योग्य भाव कसे देत नाहीत ते पण बघतो. तसेच धनगर व मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर देखील तोडला काढला जाईल, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे.