मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव शेअर करताना म्हटले की, “मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेक लोकांच्या मनात शंका होत्या. एक मंत्री न होता, नवखा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी कसा कारभार करेल, असा प्रश्न उपस्थित होता. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचे की विदर्भावरील अन्यायावर सातत्याने बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाला की, त्यांच्यावर अन्याय होईल. मात्र, पहिल्या पाच वर्षांत लोकांना कळले की, विदर्भात खूप काम झाले आहे आणि कुठल्याही भागावर अन्याय होणार नाही. राजकारणात आव्हानांची कमी नाही, पण मी धैर्याने त्यांचा सामना करत आहे आणि सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही, कारण आम्हाला सत्ता हे सेवेचे माध्यम म्हणून शिकवले आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर खुलासे केले. त्यांनी मराठा आरक्षणापासून पालकमंत्रीपदापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट आणि संयमितपणे आपले मत व्यक्त केले. महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर नाराजीचे सूर आळवले गेले होते, त्यातच छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या टीकेसह शरद पवार यांचे कौतुक केले. भाजपाकडे शिल्लक असलेले मंत्रीपद मिळवण्यासाठी भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याच्या चर्चांनाही दुजोरा मिळाला. त्याचवेळी, मनोज जरांगे पाटील पुन्हा सक्रीय झाले असून, परभणी आणि बीड प्रकरणातील विरोधकांनी ते लावून धरले असल्याचा इशारा दिला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इतर दोन्ही पक्षांसोबत चर्चा करून पालकमंत्रीपदाच्या निर्णय घेतील, आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल. मला बीडला पाठवले तरी आम्ही ते स्वीकारू. परंतु माझ्या मते, मुख्यमंत्री सामान्यतः कोणतेही पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवत नाहीत. तरीही, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावे, अशी माझी इच्छा आहे. “जर तिन्ही नेत्यांची मान्यता मिळाली, तरच ते शक्य होईल. अर्थात, या तीन नेत्यांनी मंजुरी दिली, तरच मी ते पद स्वीकारेल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. “आम्ही अडीच वर्षांमध्ये २०-२० चा सामना खेळला आणि त्या सामन्यात आम्ही विश्वचषक जिंकलो. पण आता पुढे कसोटीचा सामना येणार आहे, जो नक्कीच ड्रॉ होणार नाही, हा सामना आम्ही जिंकणारच,” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या प्रश्नावर मजा घेण्याचा हा प्रश्न नाही. जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, आणि या विषयावर आम्ही नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणताही भेद नाही. तिघांनी मिळून सर्व निर्णय घेतले आहेत. आणि पुढेही सर्व निर्णय तिघांनी मिळूनच घेतले जातील.