राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची निंदा करत म्हटले आहे की, “सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभायची असेल, तर त्यांचे मारेकरी फाशीची शिक्षा मिळालेली पाहिजे.” त्यांनी पुढे सांगितले की, या घटनेतील खरा मास्टरमाईंड समोर आणला पाहिजे, आणि तीन आरोपी अद्याप फरार आहेत. तसेच, सत्ताधारी पक्षाने या हत्येच्या घटनेला राजकारण किंवा जातीय वळण देण्यापासून दूर राहावे, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मीडियाशी बोलताना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करावा, अशी मागणी केली. त्यांनी आरोपींच्या कॉल डिटेल्स (CDR) काढण्याचा इशारा देत, “सहा तारखेला आलेल्या फोन कॉल्सचा तपास करा, चौथ्या आरोपीचा सीडीआर काढा आणि त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी करा,” असे म्हटले. सोनावणे यांनी प्रशासनावर टीका करत, “आयकर किती भरला, नाशिकमध्ये गर्लफ्रेंडला फ्लॅट दिला हे तपासा,” असं सुचवलं. तसेच, दोषी पोलिसांचा सीडीआर काढून जिल्ह्यातील पोलिसांची बदली करण्याची मागणी त्यांनी केली. “परळीतील डॉक्टरला विनाकारण गोवले जात आहे,” अशीही टीका सोनावणे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावर बोलताना गंभीर सवाल उपस्थित केले. त्यांनी सांगितले की,”संतोष देशमुख यांच्या अंगावर ५६ जखमा आहेत. त्यांनी असा कोणता गुन्हा केला होता, ज्यामुळे त्यांना एवढे मारले?” तसेच, “९ तारखेला सरपंचाच्या भावाशी कोण कोण बोलले आणि पीआयला कुणाचे फोन आले, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.” याबाबत सीडीआर काढून तपास करण्याची मागणी केली. तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असावे हा सत्ताधारी पक्षाचा निर्णय असेल, पण “जर या प्रकरणाचा खरेच तपास करायचा असेल तर अजितदादांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावे आणि सोक्षमोक्ष लावावा,” अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणी महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आता कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी बीडमध्ये पोहोचले आहेत. महाविकास आघाडीचे नेते यावरून महायुतीवर टीका करत आहेत, तर महायुतीने या प्रकरणी महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत. दोन्ही गटांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या प्रकरणाच्या तपासाबद्दल वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा होत आहे.