मंत्रिपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी अद्याप शांत झालेली नाही. तानाजी सावंत मंत्रिपदाची अपेक्षा पूर्ण न झाल्यावर नागपूर अधिवेशन सोडून गावाकडे परतले. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे देखील नाराज झाले आणि नागपूरचं अधिवेशन सोडून मुंबईला परतले. प्रकाश सुर्वे यांनी सांगितले की, “माझ्या मंत्रिपदाची अपेक्षा होती, मी नाराज नाही, पण मी दु:खी आहे.”
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आज मुंबईतील जनसंपर्क कार्यालय गाठले. नागपूर अधिवेशन सोडून अचानक मुंबईत परतलेल्या सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या शेकडो समर्थकांची गर्दी उभी राहिली. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी “सुर्वे यांना मंत्रिपद मिळालच पाहिजे” अशी मागणी केली. परिसर जोरदार घोषणांनी दणाणून गेला, आणि या घटनेने शिवसेनेत एकच खळबळ उडवून दिली.
प्रकाश सुर्वे यांनी मंत्रिपद न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मी नाराज नाही. मी लढवय्या कार्यकर्ता आहे आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं मला प्रचंड दु:ख झालं आहे. हे दु:ख मी लपवले नाही आणि लपवणार नाही.” त्यांनी हेही सांगितले की, मंत्रिमंडळात माझ नाव नसल्या कारणाने मी दु:खी आहे.
प्रकाश सुर्वे यांनी आपली भावना व्यक्त करत सांगितले की, “मी गरीब कुटुंबातून आलो आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबही गरीब घरात वाढले आहेत. त्यांना गरिबीची जाणीव आहे, त्यामुळे त्यांना माझं दु:ख समजलं पाहिजे. जेव्हा कोणालाही संधी नाकारली जाते, तेव्हा त्या व्यक्तीला किती दुःख होतं याची शिंदे यांना पूर्णपणे जाणीव असेल. एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली आणि त्यांनी ती संधी उत्तम प्रकारे वापरली. जर मला संधी मिळाली असती, तर मी पक्षाच्या विकासासाठी कष्ट केले असते आणि त्याला नंबर वन बनवले असते.”