शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली, आणि दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. परंतु दोन्ही नेत्यांनी चहा आणि नाश्ता घेतला, ज्यामुळे पुन्हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर संजय शिरसाट यांनी सूचक प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “भविष्यात काय घडेल, ते सांगता येत नाही.” यामुळे दोन्ही नेत्यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.
संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना अजित पवार आणि शरद पवार यांची भेट कौटुंबिक असल्याचं सांगितलं. मात्र ते भविष्याबद्दल स्पष्ट नाहीत. त्यांनी म्हटलं की, “शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशी चर्चा आहे, पण भविष्यात काय होईल, ते सांगता येत नाही. त्यांना शुभेच्छा. समोरच्याला कंफ्युझ्ड ठेवण्याचा त्यांचा गुण आहे.”
संजय शिरसाट यांनी शरद पवार यांचे नेतृत्व कौशल्य मान्य करत, “शरद पवारांचा एकखांबी राजकारणात हात असतो, चांगल्या आणि वाईट दोन्ही कामांमध्ये त्यांचा सहभाग आहे.” आमच्या कडून शरद पवारांना शुभेच्छा, त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे काम करावं.” असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं की, “महायुतीमध्ये आमचे स्थान घटणार नाही. राष्ट्रवादी पासून आम्हाला कोणताही धोका नाही, ते त्यांच्या पक्षासाठी काम करतात आणि आम्हीही आमच्या पक्षासाठी काम करतो. आमचा विकास प्रगतीच्या मार्गावर आहे, आणि आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत.”
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, त्यांनी सांगितले की, “शिंदे नाराज नाहीत आणि ते दिल्लीला जाणार नाहीत. आज संध्याकाळी बैठक होईल, त्यात महत्वाच्या घडामोडी उघड होतील. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचे निर्णयही ठरलेले असतील.”