महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी होऊन आठवडा पूर्ण झाला आहे, परंतु मंत्रिमंडळ विस्तार अजून बाकी आहे. १४ डिसेंबर रोजी विस्तार होणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात खाते वाटपावर चर्चा पूर्ण झाली आहे. भाजप गृह विभाग आणि नगर विकाससारखे महत्वाचे विभाग ठेवणार आहे. शिवसेनेकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग देण्यात येणार आहेत. तर अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालय असणार आहे. भाजप आपल्या दोन विभाग युतीमधील घटकपक्षांना देण्यास तयार आहे.
गृह, नगर विकास, कायदा, सामान्य प्रशासन, ग्रामीण विकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, वन आणि आदिवासी हे विभाग भाजपकडे येऊ शकतात. सार्वजनिक बांधकाम (PWD), कामगार, शालेय शिक्षण, राज्य उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा आणि वाहतूक विभाग शिवसेनेकडे येऊ शकतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे वित्त व नियोजन, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालकल्याण, मदत व पुनर्वसन, आणि अन्न व औषध प्रशासन विभाग येण्याची शक्यता आहे.
भाजपला २०, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रीपदे देण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा फॉर्म्युला ठरला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्री असू शकतात. बुधवारी फडणवीस यांचा दिल्ली दौरा होता, ज्यामध्ये अमित शहा यांच्याशी बैठक झाली होती. हा दौरा फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतरचा पहिला दौरा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १४ डिसेंबरला आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर १६ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे सेनेकडून अडीच अडीच वर्षे मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळाली आहे.