Posted in

“शरद पवारांच्या आमदाराचे निवडणूक आयोगाला चॅलेंज, प्रशासनाच्या दबावाला न जुमानता उद्या मतपत्रिकेवर मतदान”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले, तर महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमविरोधात मोहीम उचलली असून, निवडणूक आयोगाने काँग्रेससह विरोधकांना चर्चेसाठी बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज देण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने या मतदानासाठी विरोध दर्शवला आणि गावात कलम १४४ लागू केले. तरीही, मतदान घेणार असल्याचे उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील उत्तमराव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, मात्र ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरु केले. त्यांनी गावात बॅलेट पेपरवर अभिरूप मतदान घेण्याचा निर्णय घेतला, जो ३ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र, प्रशासनाने त्याला परवानगी नाकारली आहे. यावर उत्तम जानकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “प्रशासनाच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जमावबंदी आदेश लागू असला तरीही माघार घेणार नाही आणि कितीही गुन्हे दाखल झाले तरीही उद्या मतदान प्रक्रिया होणारच आहे.”

“अंतरवाली सराटीसारख्या पोलिसांच्या लाठी चार्ज आणि गोळीबाराच्या दबावानंतरही आम्ही मागे हटणार नाही. पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज आणि गोळीबारात जखमी झालो तरी ग्रामस्थ मतदान प्रक्रियेत सहभाग घेतील.” असे उत्तम जानकर म्हणाले, “पोलिसांना गुन्हे दाखल करायचे असतील तर पहिला गुन्हा माझ्यावर करा, नंतर ग्रामस्थांवर करा. ग्रामस्थांच्या प्रत्येक निर्णयात मी सहभागी असणार आहे.” लोकशाही मार्गाने चाललेल्या या प्रक्रियेला सहकार्य करायचे सोडून प्रशासनाने धास्ती का घेतली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच मारकडवाडी गावात प्रशासनाने आजपासून जमावबंदी लागू केली आहे, जी पुढील तीन दिवसांसाठी लागू राहील. ईव्हीएम विरोधात ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावर गावात दोन गट निर्माण झाले आहेत. जानकर यांच्या समर्थकांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता मतदानाचा निर्णय घेतल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला आहे.