येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाची मुंबईतील आझाद मैदानात तयारी सुरू आहे. एका बाजूला सत्तास्थापनेची तयारी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदावरून सुरू असलेला गुंता सुटत नसल्याचे दिसत आहे. आज महायुतीच्या तिन्ही पक्षांची बैठक मुंबईत होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दरे गावातून मुंबईत परतले. महायुतीतील एकनाथ शिंदे शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटाची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. शपथविधीबद्दल सर्व चर्चा या बैठकीत होणार आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागणीबाबत देखील चर्चा करण्यात येणार आहे. त्यांनी गृहमंत्रीपदाची मागणी केली आहे, मात्र भाजपने याला नकार दिला आहे त्यामुळे आता महायुतीत वाद निर्माण होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या वादावर आज बैठकीत तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.
तसेच मुंबईतील भाजप आमदारांना विधिमंडळ पक्ष बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडीया, किशोर जोरगेवार आता मुंबईत आहेत. नवनिर्वाचित आमदार करण देवतळे निरोप आल्यावर मुंबईकडे रवाना होणार आहेत. तर दुसरीकडे, नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांना अजून बैठकीचा निरोप मिळालेला नाही, त्यामुळे ते सध्या आपल्या मतदारसंघात आहेत.