Posted in

“महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंचं निष्ठेने काम करा,” मावळात भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पत्रक निघालं

Work-loyally-to Mahayuti-candidate-Sunil-Shelke-aleaflet-issued-to-BJP-workers-in-Maval

मावळ: महायुतीत सर्वात चर्चेत राहिलेल्या मावळ मतदारसंघात दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार केला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी जनसंवाद दौऱ्यातून त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. अशात मावळच्या जागेवरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होता. त्यावरूनच भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी महायुतीच्या उमेदवारांचं काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

राजेश पांडे म्हणाले की,  राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी प्रत्येक जागा महत्वाची आहे. त्यामुळे मावळातून भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विजयासाठी समर्पित भावनेने काम करावे. मावळातील भाजपचे काही नेते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची दिशाभूल करीत महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा जाहीर प्रचार करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश कार्यालयाने एका पत्राद्वारे पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.

मावळ तालुक्यातील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दुर झाला असून सर्वजण पुर्ण ताकतीनिशी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विजयासाठी रिंगणात उतरले आहेत.  केवळ भाजप उमेदवारच नव्हे तर युतीतील मित्रपक्षाचे उमेदवार लढत असलेल्या मतदारसंघातही भाजप कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे. आपल्या सर्वांच्या कठोर परिश्रमामुळे राज्यात महायुती निश्चितपणे विजयी होईल, असे पांडे यांनी पत्रात म्हटले आहे.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे  यांनी आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क साधला. मावळातील भाजप कार्यकर्ते हे पक्षनिष्ठ असून ते पक्षाच्या आदेशाचे पालन करतात. त्यामुळे या निवडणुकीतही ते महायुती धर्माचे पालन करतील, अशी ग्वाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीने दिली.

मावळात अपक्ष उमेदवाराने बंडखोरी केल्यानंतर अनेक कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट कार्यकर्त्यांना सूचना दिल्यानंतर आता भाजपचे कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत. भाजप पक्षातील कार्यकर्ते हे आदेश पाळणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील मतदारसंघात कसून कामे  केल्याचे दिसून येत आहे.