पुणे: विधानसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतशी प्रचाराची धडाकेबाज मोहीम उधाणाला येत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचार मोहिमेला नवी चालना देत घरोघरी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. पाच वर्षांचा कार्य अहवाल घेऊन ते मतदारांच्या भेटीला जात आहेत आणि नागरिकांचे आशीर्वाद मिळवत आहेत.
रोहन प्रार्थना सोसायटीतील नागरिकांच्या भेटीदरम्यान चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये कोल्हटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना आशीर्वाद देत सांगितले, “दादा, तू कोथरूडमधून दणक्यात निवडून येणार!” त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांमध्ये उत्साह संचारला आणि चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास वाढला.
चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्क मोहिमेद्वारे मतदारांच्या घराघरात पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात त्यांनी विविध सोसायटींमध्ये भेट देत नागरिकांना आपल्या पाच वर्षांच्या कामाचा हिशोब सादर केला आहे. त्यांच्या या मोहीमेचा उद्देश म्हणजे मतदारांशी थेट संवाद साधणे आणि आगामी निवडणुकीत त्यांचे मत मिळवणे.
यावेळी भाजप कोथरूड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, भाजपा युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, प्रभाग १२ चे अध्यक्ष अंबादास अष्टेकर, कोथरूडचे निवडणूक सहप्रमुख नवनाथ जाधव, कोथरूड मंडल सरचिटणीस दिनेश माथवड, आणि युवा मोर्चाचे अमित तोरडमल हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारात मतदारांच्या घराघरात जाण्याचा उपक्रम एक प्रभावी पाऊल ठरले आहे. त्यांच्या प्रचाराच्या या धडाक्यात स्थानिक नागरिकांनीही मोठा प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले आहे. कोल्हटकर यांच्यासारख्या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या आशीर्वादामुळे चंद्रकांत पाटील यांचा विजयाचा मार्ग अधिक मजबूत होत असल्याचे भाजपचे कार्यकर्ते मानत आहेत.