Posted in

मावळात भाजपच्या नेत्यांवर होणार निलंबणाची कारवाई ? मावळातील राजकीय वातावरण तापलं..!

Maval Vidhansabha

पुणे : महायुतीत ‘मावळ’ विधानसभेची जागा ही अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन दिवसात उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर करण्यात येणार आहेत. परंतु याठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवारीची मागणी केल्याने महायुतीतील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. यातच हा वाद असाच राहिला तर याचा फायदा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होणार आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी हा वाद थांबवून महायुतीचा युतीधर्म पाळावा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटातील एका बड्या नेत्यांनी दिली आहे.

महायुतीचं राज्यात पुन्हा सरकार यावे, यासाठी युतीतील तिन्हीही वरीष्ठ नेते जोमाने कामाला लागले आहेत. यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती राज्यातील प्रत्येक मतदारसंघात पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. यातच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी देखील तिन्ही पक्षातील कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आहेत. राज्याचे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व करावं, म्हणून भाजपचे कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत. परंतु भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वेगळी भुमिका घेतल्याने मावळात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यातच मावळातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नको आहेत का ? अशी चर्चा मतदारसंघात सध्या दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

भाजपचा आदेश पाळणारा कार्यकर्ता अशी भाजपची आतापर्यंत ओळख राहिली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघात देखील अशीच शिकवण दिली जाते. मावळात देखील पक्षाचा आदेश मानून काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे उदाहरण बघायला मिळतात. परंतु सध्याच्या राजकीय परिस्थिती काही जण भाजप कार्यकर्त्यांचा कोणताही विचार न घेता, पक्षाचे होणारे नुकसान न पाहता वैयक्तिक स्वार्थाचे निर्णय घेतांना बघायला मिळत आहेत. यातच भाजपचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री झाला नाही तरी चालेल, पक्षाला घवघवीत यश मिळालं नाही तरी चालेल, परंतु मावळात तालुक्यातील नेत्यांची पोळी भाजली पाहिजे, याकडे त्यांचं लक्ष लागलेलं दिसत आहे. अशी एका कोपऱ्यात नेत्यांकडून खदखद व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सुनील शेळके यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली असल्याची बातमी टीव्ही ९ मराठीने दिली आहे.

भाजपमध्ये प्रबळ आणि सुनिल शेळके यांना लढत देणारा उमेदवार म्हणून रवींद्र भेगडे यांच्या रुपाने असताना देखील ते मात्र आपल्या पक्षातील उमेदवाराची ताकद वाढवण्याऐवजी, आपल्या पक्षातील उमेदवाराला कार्यकर्त्यांना आणि मतदारांना इतर नेत्यांच्या दावणीला बांधताना आपल्याला पाहायला दिसत आहे, अशा नेत्यांवरती कारवाई का होऊ नये असा सवाल आता सर्वसामान्य कार्यकर्ते भाजपचे विचारू लागले आहेत. तर काही सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र कमळ हाच आपला उमेदवार आहे.परंतु या निवडणुकीत जर कमळ या चिन्हाचा उमेदवार नसेल तर आम्ही महायुतीचाच धर्म पाळु असं देखील सर्वसामान्य कार्यकर्ता बोलताना दिसुन येत आहे.