Posted in

संविधान भवन’ जनजागृती :….लांडगेंनी व्यक्त केली दिलगिरी! आंबेडकरांच्या फोटोखाली नाव छापल्याने विरोधकांचे राजकारण

Mahesh Landge

Mahesh Landge : पिंपरी । प्रतिनिधी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आम्ही महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी काही रिक्षाचालक व हितचिंतकांनी आपल्या रिक्षांवर हुड फलक लावले आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राखाली नजरचुकीने माझ्या नावाचा फाऊंट छापण्यात आला आहे. सदर रिक्षा हुडवरील फलकांमुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका आमदार महेश लांडगे (Mahesh Landge ) यांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भारतातील पहिले संविधान भवन उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येत असून, रिक्षा चालकांकडून रिक्षा हुडवर छावलेल्या बॅनरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राखाली महेश लांडगे यांचे नाव छापलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शहरातील विरोधी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाजमांध्यमांमध्ये टिका-टिपण्णी करुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियाद्वारे पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद साधला. यामध्ये महेश लांडगे म्हणाले की, राजकीय उद्देशाने काही व्यक्ती संबंधित रिक्षांवरील हुड बॅनरबाबत समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सबंधित रिक्षांवरील जनजागृतीचे हुड काढावेत, असे आवाहन रिक्षाचालक व माझ्या सहकारी-हितचिंतकांना करीत आहे.

काय म्हणाले आहेत महेश लांडगे वाचा…

अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, युगपुरुष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज अशा कित्येक थोर महामानवांच्या योगदानामुळेच आपला हा महाराष्ट्र आज प्रगतीपथावर अग्रेसर आहे..

पण आजही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय समाजकंटक जातीय धार्मिक तसेच भावनिक तेढ निर्माण करून आपला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत असतात.. असाच काहीसा प्रकार काल माझ्या कानावर आला…विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या सर्वश्रेष्ठ संविधानाच्या विचारांनी समृद्ध असलेले देशातील सर्वात पहिले भव्य असे संविधान भवन आपण आपल्या शहरात उभारत आहोत, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, लवकरच या संविधान भवनाचे कामही सुरू होणार आहे.. याबाबतीत माहिती देणारे रिक्षा हुड एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षावर बसवले.. त्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या खालच्या भागात अनावधानाने व नजरचुकीने माझे नाव छापले गेले होते.. यामध्ये कुणाचीही भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता..! पण तरीही विरोधकांनी त्या रिक्षाच्या हुड चे फोटो समाजमाध्यमांमध्ये पसरवून ‘मी माझी सही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर लावली अशी खोटी आणि संतापजनक बातमी व सोशल मीडिया पोस्ट व्हायरल केली.

‘ मुळात संबंधित रिक्षा हुड वर माझी सही किंवा स्वाक्षरी नसून तो फक्त नावाचा फॉन्ट आहे.. पण तरीही विरोधक महाविकास आघाडीच्या समाजकंटकांनी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.. या प्रकाराबाबत मला जेव्हा माहिती कळाली तेव्हा संबंधित रिक्षाचालकांना बोलावून त्यांना सदर हुड काढण्याची विनंती आम्ही केली, त्यांनीदेखील ते रिक्षा हुड तात्काळ काढून सहकार्य केले. हा सर्व प्रकार अनावधानाने घडला असून त्याबद्दल मी सर्व नागरिकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, या प्रकारामध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता, हे केवळ नजरचुकीने झाले असून कृपया कुणीही याबाबत कसलाही गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंती करतो..

महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते या विषयाला हवा देऊन राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी मागील अडीच वर्षाच्या त्यांच्या सत्तेच्या काळात संविधान भवनाची उभारणी प्रक्रिया पुढे का नेली नाही याचे उत्तर त्यांनी समस्त पिंपरी चिंचवडकरांना दिलं पाहिजे, अस माझं आवाहन आहे..

मुळात देशातील पहिले संविधान भवन हा प्रत्येक भारतीयासाठी आत्मीयतेचा विषय आहे शिवाय घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचा स्वाभिमान आहेत..केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांच्याबाबतीत कुणीही स्वार्थी राजकारण करू नये अशी नम्र विनंती करतो, कारण प्रत्येक पिंपरी-चिंचवडकर याआधीही एकजूट होता आणि यापुढेही एकजूटच राहील यात तिळमात्र शंका नाही. असेही त्यांनी सांगितले.