Posted in

सोसायटीचे चेअरमन्स-पदाधिकाऱ्यांची ‘फार्महाऊस पार्ट्यां’मध्येच धन्यता! हा बिहार नाही; फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचा ‘टप्प्यात आले की कार्यक्रम’ करणार!

sulbha ubale

ulbha ubale : पिंपरी । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरात सोसायटीधारकांचे ‘मसिहा’ झालेले सोसायटी फेडरेशन केवळ सत्ताधारी लोकच तुमचे कामे करु शकतात. विरोधकांपर्यंत सदनिकाधारकांना पोहोचू दिले जात नाही. सदनिकाधारक दबावात आहेत. नवीन गृहप्रकल्प निर्माण झाले की, त्या ठिकाणी चेअरमन, सेक्रटरी नेमायचे आणि त्यांना ‘फार्महाऊस’ वर मटन पार्ट्यां द्यायच्या… हा काय बिहार आहे का? असा घणाघाती सवाल महाविकास आघाडीच्या शहरातील नेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी ज्या प्रमाणे काम करीत आहेत. त्यांचा ‘टप्प्यात आले की कार्यक्रम’ करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोशी-चऱ्होलीसह भोसरी परिसरातील वीज समस्यांबाबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्या तथा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी विविध मुद्यांवर आक्रमकपणे भाष्य केले आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार अजित गव्हाणे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, शिवसेना नेत्या रुपाली आल्हाट, माजी नगरसेवक पंकज भालेकर आदी उपस्थित होते.

सुलभा उबाळे म्हणाल्या की, महावितरण प्रशासनाचे अधिकारी सत्ताधारी नेत्यांचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत. ‘‘आमदार बोले आणि अधिकारे हाले’’ अशी परिस्थिती आहे. सोसायटीधारकांनी ५०-५० लाखांचे फ्लॅट घेतले आहेत. त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू दिले जात नाही. सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष व पदाधिकारी व चेअरमन विशिष्ट नेत्यांसाठीच काम करीत आहेत. सत्ताधाऱ्यांकडे गेलो तरच तुमचे काम होईल, असे सदनिकाधारकांना सांगत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण संबोधित करतो. पण, या शहरात रोज लाईट जाते, ही सत्ताधाऱ्यांसाठी शरमेची बाब आहे. बांधकाम परवानगी दिली जाते. हजाराे फ्लॅट्स निर्माण होतात. त्या फ्लॅटधारकांना लाईट, पाणी, चांगले रस्ते, खेळाचे मैदान मिळाले पाहिजे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शहराची दुर्दशा झाली आहे. पोलीस प्रशासन, महावितरण, शासकीय प्रशासन गुलाम असल्यासारखी कामे होत आहेत. शिवरस्ता, मोशी येथील सोसायटी १० वर्षांपूर्वी तयार झाली. तरी त्यांना लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे, ही खेदाची बाब आहे, असेही सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे.

सोसायटीत लोक रहायला जाण्यापूर्वीच मतदानाचा फॉर्म भरतात…

सोसायटीधारकांवर एव्हढं हॅर्मिंग आहे की, सोसायटीत रहायला जाण्यापूर्वीच लोक मतदानाचे फॉर्म भरुन घेतात. त्या ठिकाणी गेल्यावर व्हॉट्सॲप ग्रुप तयार करायचा. त्यांच्यावर हॅर्मिंग करायचे ‘‘आम्ही तुमचं सगळं करतो… आम्ही तुमचे मसिहा आहोत’’. नंतर फेडरेशन करायचे. त्याचे अधिकारी करायचे. सोसायटीचे चेअरमन करायचे. सोसायट्यांच्या चेअरमनला बाहेर पार्ट्यांना, फार्महाउसला न्यायचे. त्यांना एका प्रेशरखाली ठेवायचे. फेडरेशनवाल्यांनी लोकांना व्यसने लावली आहेत. फेडरेशनवाल्या अधिकाऱ्यांना एकच काम आहे. प्रत्येक चेअरमनपाशी जायचे आणि दुसऱ्या पक्षाचा एकही माणूस सोसायटीत आला नाही पाहिजे, अशी व्यवस्था करुन ठेवलेली आहे. म्हणजे सोसायटीच्या नागरिकांशी कोणी इन्टरॅक्ट झाले नाही पाहिजे, हे आम्ही मोडीत काढू. हे काय बिहार नाही, असा संतापही महाविकास आघाडीच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी व्यक्त केला आहे.

फेडरेशनवाल्यांनी सोसायटीधारकांची मालकी घेतली काय?

सोसायटीधारकांना काही समस्या असतील तर त्यांनी आमच्याकडे घेवून यावे. आम्ही त्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या स्टाईलने काम करु. पिंपरी-चिंचवड युपी, बिहार नाही. फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट राजकीय लोकांसाठी काम करु नये. जर कोणी असे करणार असेल, तर त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांनी सावध रहायचं ‘टप्प्यात आले की कार्यक्रम करु’ . कारण, टँकरने पाणी, लाईट बील, डिझेलचे बील लोकांना भरावे लागतात. ज्या बिल्डरांनी सत्ताधाऱ्यांना पार्टनरशीप दिली नाही. त्यांच्या प्रकल्पाला पाणी, वीज दिली जात नाही. रस्ते दिले जात नाही. याद्वारे बिल्डरचे नाव खराब केले जाते. भोसरी विधानसभा मतदार संघात अशा घटना दिसतील. सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या बिल्डरांना महानगरपालिकेच्या सर्व सुविधा दिल्या जातात. फेडरेशनवाले दाखवत आहेत की, ‘‘आम्हीच सोसायटीधारकांचे सर्वेसर्वा आहोत’’ तुम्ही फक्त सत्ताधाऱ्यांकडे जायचे दुसरीकडे गेला तर तुमची कामे थांबवू. सोसायटीधारकांची मालकी घेतल्यासारखे वातावरण आहे, अशी चुकीची कामे फेडरेशनवाले करीत असतील तर त्यांना आव्हान आहे. आमच्या टप्प्यात आलात की कार्यक्रम करणार, असा गंभीर इशाराही महाविकास आघाडीच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी दिला आहे.