राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांनाही वेग आला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या आगामी सरकारचे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत स्पष्ट विधान केले आहे.
संजय राऊत यांनी निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे ठामपणे सांगितले. त्यांनी ठाकरे 2 सरकार येणार असल्याचा दावा केला, ज्यामुळे महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. याआधीच्या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय निवडणुकीपूर्वी जाहीर न करण्याची भूमिका घेतल्याचेही वृत्त आले होते.
याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. कलम 370 रद्द केल्याचा फायदा केवळ भाजपला झाला असून, देशाला त्याचा काहीही फायदा झाला नाही, असे ते म्हणाले. काश्मीरमध्ये 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवान शहीद होत असल्याने त्यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी मोदींवर बहुमत नसल्याचा आरोपही केला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पावर बोलताना राऊत यांनी महायुती सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी महायुती सरकारवर आदानी समूहाला मुंबईतील बहुमूल्य भूखंड देत असल्याचा आरोप केला. कांजूरमार्गसह एकूण 22 भूखंड अदानींना देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आणि शिवसेना या प्रकल्पाची एकही विट रचू देणार नाही, असा इशारा दिला. तसेच, मंत्रिमंडळ बैठकीत सुरू असलेल्या वादांवर भाष्य करताना त्यांनी हे शिंदे आणि फडणवीस गँगमधील वाद असल्याचे सांगितले.